भारताच्या परकीय चलन साठ्यात झपाट्याने घट
मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। नव्या वर्षाची सुरुवात भारताच्या विदेशी चलन भंडारासाठी धक्कादायक ठरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2 जानेवारीला समाप्त झालेल्या आठवड्यात देशाच्या एकूण विदेशी मुद्रा भंडारात तब्बल 9.809
India Foreign Exchange Reserves


मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। नव्या वर्षाची सुरुवात भारताच्या विदेशी चलन भंडारासाठी धक्कादायक ठरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2 जानेवारीला समाप्त झालेल्या आठवड्यात देशाच्या एकूण विदेशी मुद्रा भंडारात तब्बल 9.809 अब्ज डॉलर्सची घट नोंदली गेली असून भंडार 686.801 अब्ज डॉलर्सवर घसरले आहे. विशेष म्हणजे याआधीच्या आठवड्यात भंडारात 3.293 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती आणि ते 696.61 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. एका आठवड्यातच चित्र पालटल्याने आर्थिक तज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आर्थिक बाजारातील चढउतार, डॉलरची वाढती मजबुती आणि इतर प्रमुख चलनांतील कमजोरी यांचा या घसरणीवर थेट परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार विदेशी चलन आस्थापने म्हणजेच फॉरेन करन्सी अ‍ॅसेट्समध्ये सर्वाधिक घट झाली आहे. FCA 7.622 अब्ज डॉलर्सने घसरून 551.99 अब्ज डॉलर्सवर आली आहे. अमेरिकन डॉलरसह युरो, पाउंड आणि जपानी येन यांसारख्या चलनांच्या किमतीतील चढउतारामुळे एकूण विदेशी चलन भंडाराच्या मूल्यावर परिणाम झाला आहे. या कालावधीत भारताच्या सोन्याच्या साठ्यातही घट नोंदली गेली असून सोने भंडाराचे मूल्य 2.058 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 111.262 अब्ज डॉलर्सवर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमतीतील अस्थिरता आणि डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या मूल्यात दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

केवळ विदेशी चलन आणि सोनेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संस्थांमधील भारताची आरक्षित स्थितीदेखील कमकुवत झाली आहे. विशेष आहरण अधिकार (SDR) 25 दशलक्ष डॉलर्सने घटून 18.778 अब्ज डॉलर्सवर आले असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे भारताची आरक्षित स्थिती 105 दशलक्ष डॉलर्सने घटून 4.771 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तज्ञांच्या मते डॉलरची मजबुती, अमेरिकन बाँड यिल्डमध्ये वाढ, जागतिक चलन बाजारातील अस्थिरता आणि सोन्याच्या किमतीतील कमजोरी ही घट होण्याची मुख्य कारणे असू शकतात. मात्र तरीही भारताचे विदेशी चलन भंडार तुलनेने मजबूत मानले जात असून देशाच्या आयात गरजा दीर्घकाळ पूर्ण करण्याइतका पुरेसा साठा अद्याप उपलब्ध असल्याचेही अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande