
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील कुख्यात गुंड प्रतीक ऊर्फ पिन्या ऊर्फ साईनाथ गणेश खडके (वय २२, रा. भारतनगर, तुळजाभवानी चौक, गारखेडा) याला एमपीडीए कायद्या अंतर्गत दुसऱ्यांदा स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी खडके विरोधात स्थानबद्धतेचे आदेश जारी केले असून त्याला अकोला जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले.
प्रतीकविरुद्ध पुंडलीकनगर व सातारा ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, घातक शस्त्राने गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा, प्राणघातक शस्त्रांसह दंगा, बेकायदेशीर जमाव, घरफोडी, चोरी, गृहअतिक्रमण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, प्रतिबंधकआदेशाचे उल्लंघन, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे तसेच शांतता भंग करण्याच्या उद्देशाने धमकावणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.यापूर्वी त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११० अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच सन २०२२ मध्येही त्याला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्याने पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनिष कल्याणकर, अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक राऊत, पोलिस हवालदार डोंगरे, दिपाली सोनवणे, महादेव दाणे, संदीप बीडकर, अंकुश वाघ, अजय कांबळे आदींनी केली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis