
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात आरोप–प्रत्यारोपांना जोर आला आहे. एमआयएम विरुद्ध काँग्रेस हे शाब्दिक युद्ध आता अधिकच तीव्र झालं आहे. एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अकोल्यात दोन सभा घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता काँग्रेसनेही ओवेसींना प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे.
जळगावचे मौलाना हारून यांनी थेट ओवेसींना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करत त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अकोल्यात तब्बल ३५ वर्षे भाजपचा आमदार असताना ओवेसी कधीच येथे आले नाहीत. मात्र काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार निवडून आल्यानंतरच ओवेसींच्या अकोला वाऱ्या सुरू झाल्या, असा आरोप मौलाना हारून यांनी केला आहे.
“तुम्ही बॅरिस्टर आहात, पण स्वतःला छिचोरा म्हणत आहात. आम्ही छिचोऱ्यांच्या तोंडी लागत नाही,” असा टोला ही त्यांनी लगावला.याआधी ओवेसींनी आपल्या भाषणात स्वतःला ‘लैला’ म्हणत मौलाना हारून यांनी आपल्या प्रेमात पडू नये, असा सल्ला दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना मौलाना हारून यांनी मिश्किल शैलीत, “लैला आता म्हातारी झाली आहे, त्यामुळे तुमच्या प्रेमात कुणीही पडणार नाही,” असं म्हणत पलटवार केला.ओवेसी हे राजकारणात पेहलवान असून ते सेक्युलर उमेदवारांना पाडण्याचं काम करत असल्याची टीकाही मौलाना हारून यांनी केली. काही दिवसांपूर्वी एमआयएमला मतदान करू नका असा ‘फतवा’ मौलाना हारून यांनी काढल्याचा आरोप ओवेसींनी केला होता. मात्र यावर उत्तर देताना, ओवेसी हे अर्थाचा अनर्थ करून लोकांना भ्रमित करत असून सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप मौलाना हारून यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे