अकोट भाजप-एमआयएम युतीचं खापर माध्यमांवर फोडण्यात आल्याचा प्रकार समोर
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)। संपूर्ण राज्यात गाजलेल्या अकोट येथील एमआयएम भाजप युतीचं खापर आता माध्यमांवर फोडण्यात आल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या सत्ता स्थापनेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेल्या
P


अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।

संपूर्ण राज्यात गाजलेल्या अकोट येथील एमआयएम भाजप युतीचं खापर आता माध्यमांवर फोडण्यात आल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या सत्ता स्थापनेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेल्या युतीनंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावर भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी थेट माध्यमांवरच खापर फोडत “माध्यमांनी चिंधीचा साप केला” असा आरोप केला आहे.

अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेला हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला.या युतीनंतर तीव्र टीका सुरू होताच दोन्ही पक्षांकडून युती तोडल्याची घोषणा करण्यात आली. भाजपसोबत स्थापन करण्यात आलेल्या ‘अकोट विकास मंच’मधून बाहेर पडण्यासाठी एमआयएमकडून शासकीय प्रक्रिया देखील राबविण्यात आली. मात्र युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून खुलासे देण्याची स्पर्धा सुरू झाली. विश्वासात न घेता भाजपसोबत युती केल्याचा आरोप करत एमआयएमने माघार घेतली. आम्ही भाजपसोबत नाही, हे दाखवण्यासाठी अकोल्यात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेत भाजपसोबत युती करणारे नगरसेवक मंचावर येत पक्षनिष्ठा व्यक्त करताना दिसले..

दरम्यान, भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आम्ही कोणालाही युतीसाठी बोलावले नव्हते, इतर नगरसेवकांनीच सत्तेत सामावून घेण्याची मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला. एमआयएमला सोबत घेण्याची आमची इच्छा नव्हती, मात्र ते स्वतःहून अकोट विकास मंचात सहभागी झाले, असे भारसाकळे म्हणाले.या संदर्भात कुचबुज झाल्यानंतर आम्ही त्यांना बाहेर काढले, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात एमआयएमने स्वतः संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून या युतीतून बाहेर पडल्याचे वास्तव आहे.दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएम ही या युतीत सरळ आमच्यासोबत न येता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सोबत युतीत करत आमच्या युतीत सामील झाल्याचं विधान केले आहे.

याच युतीत विरोधी पक्ष असलेल्या उबाठा गटाचे दोन नगरसेवकही सहभागी झाल्याचे समोर आले. “तुम्ही आमचे राजकीय विरोधक आहात, तरीही इथे कसे?” असा सवाल केल्यावर त्यांनी बिनशर्त, कोणतेही पद न घेता साथ देण्याची तयारी दर्शविल्याचे भारसाकळे म्हणाले. कोणी सत्तेत सहभागी होत असेल तर त्यांना घेण्यात हरकत काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र असे असेल तर उबाठा गटाची भाजपासोबत जाण्याची मजबुरी काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे भाजपासोबत कधीच जाणार नाही, अशी भूमिका आणि दुसरीकडे सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी का, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

मीडिया ही खऱ्याखुऱ्या बातम्या प्रसारित करतात असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे तरी या ठिकाणी असा प्रकारचा गट स्थापन करण्यात आला होता हे म्हणाले. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कारवाई करतील असेही ते म्हणाले.

अखेर तीव्र टीकेनंतर भाजप आणि एमआयएम यांची युती तुटली आहे. या प्रकरणात भाजपने आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एमआयएमने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांच्यावर होणारी कारवाई टळली असली, तरी भाजप आपल्या आमदारावर नेमकी कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande