
नवी दिल्ली , 12 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतात नियुक्त करण्यात आलेले नवे अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार करारावरील चर्चा १३ जानेवारी २०२६ पासून पुन्हा सुरू केली जाईल. या वक्तव्यानंतर शेअर बाजारात जोरदार सुधारणा पाहायला मिळाली आहे.
सर्जिओ गोर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी स्पष्ट केले की, भारत–अमेरिका संबंधांना पुढील पातळीवर नेणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री खरी आणि दृढ आहे. तसेच, पुढील एक-दोन वर्षांत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौऱ्यावर येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सर्जिओ गोर म्हणाले की, येत्या काळात भारत–अमेरिका संबंध हे जगासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि अमेरिकेसाठी भारताइतका महत्त्वाचा दुसरा कोणताही भागीदार नाही. बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारत आणि अमेरिकेतील संबंध सर्वाधिक महत्त्वाचे असून, ते येणाऱ्या अनेक दशकांचे भवितव्य ठरवणारे असतील, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode