
चेन्नई, 12 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या असताना प्रचाराचा वेग प्रचंड वाढला आहे. राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील बडे नेतेही महाराष्ट्रात येऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे तमिळनाडूतील नेते के. अनामलाई यांनी नुकतेच मुंबईत येऊन भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. तेव्हा त्यांनी “Bombay is not Maharashtra City” असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील सभेत अनामलाई यांच्यावर टीका केली होती. आता याच टीकेला प्रत्युत्तर देताना अनामलाई यांनी मुंबई हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कमी मानले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
धमक्यांवर बोलताना अनामलाई म्हणाले की, मला धमक्या देणारे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. जर धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात बसून राहिलो असतो. कुणीतरी असे लिहिले आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटतील, तर अशा लोकांनी नक्की प्रयत्न करून पाहावा, मी पुन्हा मुंबईत येणारच आहे. एखाद्या नेत्याचे कौतुक केल्याने त्याची ओळख कमी होत नाही, तसेच मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्राच्या लोकांचा सन्मान कुठेही कमी होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अनामलाई यांनी यापूर्वी मुंबईत बोलताना केंद्र, राज्य आणि बीएमसी असा ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असल्यास मुंबईचा सर्वांगीण विकास अधिक गतीने होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. मुंबईचे बजेट ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून चेन्नई आणि बंगळुरूपेक्षा खूप मोठे आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन आणि प्रशासन नीट हाताळणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वादंग चांगलाच पेटला असून निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule