
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : मकरसंक्रांत सणाच्या काळात पतंग उडवण्याचा आनंद घेताना अपघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वीज सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पतंग उडवताना अनेकदा नायलॉन किंवा चायनीज मांजा वापरला जातो. हा मांजा विजेच्या तारांमध्ये अडकला तर शॉर्टसर्किट, वीजपुरवठा खंडित होणे, आग लागणे किंवा जीवितहानीसारख्या गंभीर घटना घडू शकतात. तसेच विजेच्या खांबावर, ट्रान्स्फॉर्मरजवळ किंवा उपकेंद्राच्या परिसरात पतंग उडवणे अत्यंत धोकादायक आहे. महावितरणकडून अपघात टाळण्यासाठी नागरिकांना पुढील महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. पालकांनी पतंग उडवताना लहान मुलांना विद्युत सुरक्षेची काळजी घेण्याबाबत समजून सांगावे. शक्यतो पालकांनी मुलांसोबत थांबावे. विजेच्या तारांजवळ किंवा खांबावर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. ओले कपडे, सळई वा इतर लोखंडी वस्तू किंवा हाताने विजेच्या तारांना स्पर्श करू नये. नायलॉन वा चायनीज मांजा वापरणे टाळावे, पतंग उडवण्यासाठी मोकळी व सुरक्षित जागा निवडावी.
पतंग उडवताना योग्य ती काळजी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतात आणि सर्वजण सुरक्षितपणे सणाचा आनंद घेऊ शकतात. वीज सुरक्षितता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या नजीकच्या कार्यालयास किंवा २४ तास सेवेत असलेल्या ग्राहक सुविधा केंद्राच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी