लोककलेतून अकोल्यात मतदार जनजागृती
अकोला, 13 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मा
Photo


अकोला, 13 जानेवारी (हिं.स.)।

अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या अनुषंगाने आज दि. 13 जानेवारी 2026 रोजी या उपक्रमांतर्गत सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी वासुदेव वेश धारण करून पोवाडा, गीते व लोककलेच्या माध्यमातून मतदानाचा संदेश देत रस्तोरस्ती फिरून जनजागृती केली. त्यांच्या सादरीकरणातून मतदानाचा हक्क, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी, निर्भय व निष्पक्ष मतदानाचे महत्त्व तसेच प्रत्येक मताचे मूल्य प्रभावीपणे मांडण्यात आले. लोककलेच्या या अनोख्या सादरीकरणामुळे नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर जनजागृती मोहिमेत डिजिटल नोडल अधिकारी नईम फराज, मतदार जनजागृती सहायक संजय खराटे तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मो. मुस्लिम यांनी सक्रिय सहभाग घेतला. या पथकाने नायगाव, टारफैल व गवळीपुरा परिसरात प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी नोडल अधिकारी निवडणूक हरिशचंद्र इटकर यांच्या हस्ते मतदार नागरिकांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करून मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची माहिती व आवश्यक सूचना समजावून सांगण्यात आल्या.

या जनजागृती दरम्यान नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदले आहे का याची खात्री करण्याचे, तसेच वृद्ध, दिव्यांग व असहाय्य मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला.

या उपक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांचेही सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande