
चंद्रपूर, 14 जानेवारी (हिं.स.)।
प्रत्येक बालक आपल्या पालकांचा लाडका असतो. त्यामुळे मुलांच्या आग्रहाला व आवाहनाला पालक सकारात्मक प्रतिसाद देतात, ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या २६ मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला घटनात्मक हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाही अधिक सक्षम होण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत ‘सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (SVEEP) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना पत्र लिहून मतदानासाठी प्रेरित करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
मतदार संघांत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग व्हावा, मतदान प्रक्रियेची माहिती मिळावी तसेच सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने निर्भीड व निरपेक्षपणे मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मतदारांमध्ये जाणीव व जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप अंतर्गत सर्व मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव