
बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। जिजाऊ ज्या कुळात जन्माला आल्या, त्या तीन पिढ्यांमध्ये त्या एकमेव स्त्री होत्या. ना आत्या, ना बहीण, ना मुलगी जणू तीन पिढ्यांची संपूर्ण स्त्रीशक्ती जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वात एकवटली होती. त्याच ऊर्जेतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा नररत्न घडला, असे भावस्पर्शी काव्यात्मक विवेचन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित व्याख्यान-काव्य मैफिलीत ते बोलत होते. हा कार्यक्रम तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात सोमवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते. भालेराव यांनी जिजाऊंच्या जीवनावर आधारित विविध काव्यगाणी सादर करून उपस्थितांना भावनिक केले. जिजाऊंच्या संस्कारांची आणि 'आधी घडवा चरित्र आपुले, मगच घ्या छत्रपतीचे नाव' या ओळींतून शिवरायांच्या घडणीत त्यांच्या भूमिकेची प्रभावी मांडणी केली. जिजाऊंच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या घडणीतल्या योगदानापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी काव्यरूपाने उलगडला.
या कार्यक्रमात प्रा. प्रदीप रोडे यांच्या संकल्पनेतून मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'सायकल बँक' या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्यात २५ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले असून, हा उपक्रम टप्प्याटप्याने इतर गरजू मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.प्रा. प्रदीप रोडे यांनी मुलींच्या सक्षमीकरणावर भर दिला. जिजाऊ, अहिल्यामाता, माता रमाई, फातिमा शेख यांची ओळख त्यांच्या कार्यामुळे आहे. तशीच ओळख आपल्या मुलींनी घडवली पाहिजे. यासाठी स्किल आणि विल या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत, असे अधोरेखित केले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis