
जळगाव, 14 जानेवारी (हिं.स.) नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या १५ दिवसांत कापसाच्या दरात प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपयांची लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे कापूस उत्पादकांची अडचण काही अंशी दूर झाली आहे. सध्या कापसाचा भाव ८ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.गेल्या दोन वर्षांत प्रथमच कापसाचे दर ७,९०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
देशात ३१ डिसेंबरपर्यंत कापसावर आयात शुल्क माफ असल्याने स्थानिक बाजारात दरांवर दबाव होता. मात्र १ जानेवारीपासून केंद्र सरकारने कापसावर ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याने बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.आयात शुल्क वाढीमुळे परदेशी कापसाची आवक कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे देशांतर्गत कापसाला मागणी वाढली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बाजारातील माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी कापसाचा दर ६,९०० ते ७,२०० रुपयांदरम्यान होता. २ जानेवारी २०२६ रोजी हा दर ७,४०० ते ७,६०० रुपये झाला, तर १३ जानेवारी २०२६ रोजी कापसाचा दर ७,६०० ते ७,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.या दरवाढीमुळे कापूस उत्पादकांसाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. दुसरीकडे, बाजारभाव सीसीआयच्या हमीभावापेक्षा जास्त मिळत असल्याने सीसीआय केंद्रांवरील गर्दी कमालीची ओसरली आहे. दर वाढीमुळे अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस आता बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती अनुकूल राहिल्यास कापसाचा दर ८ हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर