
- सर्वच राजकीय पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची
- छायाचित्र असलेली 12 ओळखपत्र ग्राह्य
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.) - राज्यातील बहुप्रलंबित २९ महापालिकांसाठी उद्या, गुरुवारी मतदान होणार आहे. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी सुरू असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील २,८६९ जागांसाठी एकूण १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे ४ सदस्यीय असून काही प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय आहे. त्याठिकाणी मतदानांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मतं द्यावी लागणार आहे. त्यांच्या ईव्हीएमवर ४ वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. या प्रत्येक मतपत्रिकेवर त्या त्या क्रमांकाच्या सदस्यपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आणि नोटाचे बटन असेल. मतदारांना ईव्हीएममध्ये या सर्व मतपत्रिकांच्या समोर असलेलं बटन दाबावं लागेल. मत नोंदवल्यावर ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच्या समोरचा लाइट लागेल. सर्व उमेदवारांना मत दिल्यावर शेवटी बीप असा आवाज येईल आणि मतदान पूर्ण झालं याची खात्री मतदारांना मिळेल.
सर्वांचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे. जवळपास सात ते आठ वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. पारंपरिक प्रचाराचे तंत्र बदलून यंदा सर्वच पक्षांनी मतदारांशी संपर्क साधण्याकरिता नवीन प्रयोग केले.
लोकशाहीचा हा महत्वाचा उत्सव शांततेत आणि मोठ्या सहभागाने पार पडावा, यासाठी राज्य सरकारडून संबंधित मतदान क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळणार असून मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बल, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
छायाचित्र असलेली 12 ओळखपत्र ग्राह्य
यासाठी निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल. याशिवाय छायाचित्र असलेली इतर १२ ओळखपत्र दाखवली तरीसुद्धा मतदान करता येईल. या ओळखपत्रांमध्ये पारपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्ती वेतनाची कागदपत्र, लोकप्रतिनिधींची ओळखपत्रं, स्वातंत्र्य सैनिकांचं ओळखपत्र, बँक आणि टपाल खात्याचे पासबुक, दिव्यांग दाखला, मनरेगाचं जॉब कार्ड किंवा आरोग्य विमा योजनेचं कार्ड यांचा समावेश आहे.
कोणकोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक?
मुंबई विभाग : बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल
पश्चिम महाराष्ट्र विभाग : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजीउत्तर महाराष्ट्र विभाग : नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालनाविदर्भ विभाग : नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी