
चंद्रपूर, 14 जानेवारी (हिं.स.)। नागभीड तालुक्यातील टेकरी येथील शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अगदी गावालगत आणि रस्त्याच्या कडेला ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू वर्षातील हा पहिलाच वन्यजीव हल्ल्यातील बळी ठरला आहे.
नागभीड तालुक्यातील नागभीड वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या टेकरी गावात तोरगाव येथील भाऊराव विठोबा राऊत (६०) यांनी ठेक्याने शेत घेतले होते. भाऊराव राऊत हे सायंकाळच्या वेळी आपल्या शेतात तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते. शेतातील काम आटोपून ते घरी जाण्याच्या तयारीत असतानाच वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेत हे गावालगत व रस्त्याच्या कडेला असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची २५ हजारांची मदत देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी हिं.स. शी बोलताना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव