
बीड, 16 जानेवारी (हिं.स.)।
धार्मिक कार्यक्रमातून मिळणारे समाधान हे अंतिम असते. अध्यात्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात सर्वांनी निसंकोचपणे सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथे आमदार सुरेश धस आणि संयोजन समितीच्या वतीने संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथा निरूपण मंदार महाराज रामदासी करत आहेत. या कथेच्या दिवशी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मंडपात उपस्थित राहून कथा ऐकली. त्यांनी मंदार महाराजांच्या कथा निरूपण कौशल्याचे मनापासून कौतुक केले. आयोजकांचेही अभिनंदन केले. धोंडे म्हणाले, अशा धार्मिक कार्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. धर्म हे सत्य, संयम, कष्ट, माणुसकी, मानवता, ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव यांसारख्या मूल्यांना अधोरेखित करतो. त्यामुळे मानवतावादाचा पुरस्कार करत सर्वांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हावे. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सौ. प्राजक्ताताई धस, शैलजा थोरवे, सुखलाल मुथा, दिनकरराव तांदळे, अशोकदेवा जोशी, माजी सरपंच नामदेव राऊत उपस्थित होते.
आपल्या पवित्रवाणीतून आणि केलेल्या अभ्यासातून रामायणातील अनेक प्रसंग साक्षात जिवंत करण्याचे हातोटी आणि कौशल्य मंदार महाराज रामदासी यांना लाभलेले आहे. त्यांच्या वाणीतून अनेक भाविक भक्तांमध्ये अध्यात्म समर्पणाचा भाव निर्माण होण्याची प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत ह.भ.प. मंदार महाराज यांच्या कथा निरूपण कौशल्याचे मनापासून माजी आ. भीमराव घोंडे यांनी कौतुक केले आणि आयोजकांनाही धन्यवाद दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis