पनवेलमध्ये भाजपा आघाडीवर; ‘इतर’ उमेदवार ठरले किंगमेकर
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलात भाजप सर्वाधिक जागा जिंकत आघाडीवर राहिला आहे. भाजपने २४ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. मात्र, ‘इतर’ म्हणजेच अपक्ष व स्थानिक
पनवेलमध्ये भाजप आघाडीवर; ‘इतर’ उमेदवार ठरले किंगमेकर


रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलात भाजप सर्वाधिक जागा जिंकत आघाडीवर राहिला आहे. भाजपने २४ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. मात्र, ‘इतर’ म्हणजेच अपक्ष व स्थानिक गटांच्या उमेदवारांनी तब्बल २२ जागा जिंकत निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली आहे.

या निकालात काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले असून शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांना खातेही उघडता आलेले नाही.

पनवेलच्या राजकारणात यंदा स्थानिक प्रश्न, प्रभागनिहाय समीकरणे आणि उमेदवारांची वैयक्तिक पकड या घटकांचा मोठा प्रभाव दिसून आला. त्यामुळेच ‘इतर’ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप जरी संख्याबळात पुढे असला तरी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यासाठी अपक्ष व स्थानिक गटांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

निकालानंतर सत्तास्थापनेबाबत हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून अपक्षांशी संपर्क वाढविण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांत पनवेलमध्ये सत्तासमीकरणे कशी जुळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, पनवेलचा कौल हा भाजपसाठी आघाडीचा दिलासा देणारा असला तरी अपक्षांच्या भूमिकेमुळे पुढील राजकारण अधिक रंगतदार होणार, हे मात्र निश्चित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande