उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रवीशेठ भोईर बिनविरोध
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून भाजपचे रवीशेठ भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे उरण शहरात आनंद आणि उत्साहाचे
उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रवीशेठ भोईर यांची बिनविरोध निवड


रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून भाजपचे रवीशेठ भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे उरण शहरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उरण नगर परिषदेची निवडणूक दि. २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली होती, तर दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे १२ उमेदवार, महाविकास आघाडीचे ९ उमेदवार तसेच नगराध्यक्षपदासाठी १ उमेदवार निवडून आला होता. बुधवारी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती; मात्र या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने भाजपचे रवीशेठ भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशानंतर भाजपच्या वतीने उरण नगर परिषद परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिर चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा देव मंदिर मार्गे पुन्हा राजपाल नाका व गणपती चौकातून आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात येऊन समाप्त झाली.

या मिरवणुकीत आमदार महेश बालदी, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा मोर्चा तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उरणच्या विकासासाठी ही निवड नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande