
अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.) | सूर्यगंगा नदीवरील पूल न बांधल्याने शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
तिवसा तालुक्यातील निंभोरा दे.गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी सूर्यगंगा नदी पार करावी लागत असल्याने अक्षरशः जीव मुठीत धरून ये–जा करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी पादन रस्त्यावर पूल किंवा बंधाऱ्याची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.नदीला वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि विशेषत महिलांना कंबरभर पाण्यातून चालत जावे लागते. शेतीकामासाठी जाणाऱ्या मजूर वर्गात महिलांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यातून जाताना कपडे पूर्णपणे भिजतात, त्यामुळे शेतात काम करताना अडचणी निर्माण होतात.रात्रीच्या वेळी वीजपुरवठा असताना ओलीतासाठी शेतात जाणे म्हणजे धोक्याशी खेळ ठरत आहे.
पाण्यात साप, विंचू सारख्या इतर जंतूंचा धोका असल्याने जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महिलांबरोबरच वयोवृद्ध नागरिकांनाही कंबरभर पाण्यातून नदी पार करणे अशक्यप्राय झाले आहे.एकीकडे शासनाकडून“लाडकी बहीण” अशा घोषणा दिल्या जातात, मात्र प्रत्यक्षात महिलांना शेतात जाण्यासाठी नदीतून कपडे भिजवत चालावे लागत असतील तर हा महिलांच्या सन्मानाचा अपमान नाही काय? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ही परिस्थिती सहन करण्यापलीकडे गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.प्रशासनाची दखल न घेतल्याने काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तात्पुरत्या स्वरूपात बंधारा उभारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शासनाने करायचे काम शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून करावे लागणे ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही. कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांची अवस्था ‘जैसे थे’च राहते,” असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला.राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या वेळी नव्हे, तर प्रत्यक्ष निंभोरा येथे येऊन शेतकऱ्यांची दैनंदिन परिस्थिती पाहावी, अशी मागणी होत आहे. दररोज जीव धोक्यात घालून ये–जा करताना शेती करायची की सोडून द्यायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.या ठिकाणी सूर्यगंगा नदीवर कायमस्वरूपी छोटा पूल तातडीने उभारण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची दळणवळणाची समस्या सुटेल व शेतीकाम सुरळीत होईल, अशी मागणी होत आहे.अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यावेळी विकास थोटे, राजेश पुणस, देवानंद थोटे, दिनेश थोटे, ऋषिकेश निंघोट, संदीप दिघडे, महेश निंगोट, भास्कर थोटे, नरेंद्र थोटे, विजय तालान यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी