
अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.)।
शहरात सध्या सुरू असलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांचा फायदा घेत दुचाकीस्वार चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बडनेरा आणि राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे विशेषतः एकट्या किंवा मैत्रिणींसोबत कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिली घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजयपतनगर परिसरात दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. फिर्यादी ज्योती नंदकिशोर अंबुरे (वय ५७) या घरासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांनी क्षणाचाही विलंब न करता ज्योती अंबुरे यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेली. या झटापटीत पोतीचे पेंडंट खाली पडले असले तरी चोरटे सोन्याची पोत घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर अवघ्या अर्ध्या तासात म्हणजेच सायंकाळी सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास दुसरी घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तविहार कॉलनी परिसरात घडली. फिर्यादी मयुरी नितीनर्सिंग ठाकूर (वय ३८) या आपल्या मैत्रिणीसोबत हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना गाठले. दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने मयुरी ठाकूर यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. फिर्यादीने आरडाओरड करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले.या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकसारखीच पद्धत वापरल्याचे दिसून येत आहे. विनाक्रमांकाची दुचाकी, दोन इसम आणि महिलांना एकट्या किंवा कार्यक्रमासाठी जाताना लक्ष्य करणे, असा समान धागा पोलिस तपासात समोर आला आहे. बडनेरा येथील सहायक पोलिस निरीक्षक सुमेध सोनोने तर राजापेठ येथील सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे हे अधिक तपास करीत आहेत. शहरात पुन्हा चेनस्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी