
लातूर, 17 जानेवारी, (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीत लोकशाहीचा महासंग्राम पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'गद्दारी पॅटर्न' लातूरच्या जनतेने पूर्णपणे नाकारला असून, काँग्रेस पक्षाने ४३ जागा जिंकत ऐतिहासिक रेकॉर्डतोड विजय संपादन केला आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या झंझावाती नेतृत्वापुढे विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
जनतेचा कौल 'देशमुख' नेतृत्वालाच!
निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पक्षनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या लातूरकरांनी गद्दारी करणाऱ्यांना वेळीच घरी बसवले आहे, अशा भावना राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. अमित देशमुख यांनी संपूर्ण शहरात एकाकी झुंज देत काँग्रेसचा गड अधिक मजबूत केला आहे.
निकालाचे पक्षनिहाय बलाबल:
काँग्रेस: ४३ (स्पष्ट बहुमत)
भाजप: २२
वंचित: ०४
रा.कॉ.: ०१
एकूण जागा: ७०
निकालाची वैशिष्ट्ये:
काँग्रेसने प्रभाग ३, ८, ९, १० आणि १२ मध्ये निर्भेळ यश मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. भाजपने प्रभाग १४ ते १८ मध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर विजय मिळवून शहरात आपली उपस्थिती दर्शवली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis