राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल - चंद्रकांत पाटील
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्ष
राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल - चंद्रकांत पाटील


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कार्यक्रमास केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, २१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. यामुळे विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी तयार होतील.

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण धोरणामुळे आत्मज्ञान, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.

कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया - डॉ. अजय कुमार सूद

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले की, भारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असून, कुतूहल, सर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षण, रोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.

डॉ. सूद यांनी ‘एस-लाइफ फ्रेमवर्क’ची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नाते, प्रयोगशाळांचा पुनरुज्जीवन, संशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरण, विज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असून, देशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0” च्या माध्यमातून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालत, आजचा युवक धैर्य, सर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेल, अशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.

विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले आणि ८८ हजार २०२ मुलींचा समावेश असून इतर ०२ विद्यार्थी समाविष्ट आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी १ लाख ४९ हजार ९८२ विद्यार्थ्यांचा समावेश असून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २२ हजार ५४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ७४ हजार ७२९ मुले आणि ७५ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ५८९ मुले आणि १२ हजार ९५० मुलींचा समावेश असून इतर १ विद्यार्थ्याचा समावेश आहे.

६०२ स्नातकांना पी.एचडी पदवी

यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये विविध विद्याशाखेतील ६०२ स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २६९, वाणिज्य व व्यवस्थापन १४५, मानवविज्ञान विद्याशाखेसाठी १०९ आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेसाठी ७९ पदव्यांची संख्या आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ पदके मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ मुली व ७ मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर २ स्पर्धा पारितोषिकेही यावेळी प्रदान करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande