
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना काठावर पास झाली आहे. अत्यंत कमी जागा मिळाली आहेत. शिरसाट यांच्या पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. मध्य विधानसभा मतदार संघात तीन तर पूर्व मतदार संघात शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी विजश्री खेचून आणली आहे. ९७ जागा लढवून केवळ तेरा जागा निवडून आल्यामुळे पालकमंत्र्यांचे नेतृत्व येत्या काळात शहरात पक्षाला बळकट करू शकेल का, असा सवाल विचारला जात आहे.
या निवडणुकीतही भाजपने जास्तीच्या जागा द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी होती. ही मागणी मान्य न झाल्याने दोन्हीही पक्षांनी स्वबळाचा नारा देत उमेदवार उभे केले.शिवसेनेने ९७ उमेदवारांना संधी दिली. त्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत आणि कन्या हर्षदा यांचाही समावेश होता. या दोघांच्या विजयासाठी शिरसाट यांनी कसोशीने प्रयत्न केले. असेच प्रयत्न त्यांनी अन्य उमेदवारांसाठी केले असते तर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या वाढली असती असे बोलले जात आहे. पश्चिम मतदारसंघातील केवळ दोन प्रभागांमध्ये शिवसेनेला संपूर्ण पॅनल निवडून आणता आले. अन्य ठिकाणी भाजपने शिवसेनेला झोपवले. मध्य विधानसभा मतदारसंघात केवळ तीन जागा शिवसेनेच्या पारड्यात पडल्या आहेत. त्यात या मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश यांच्या एका जागेचा समावेश आहे. पूर्व मतदारसंघात दोन जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. २२ क्रमांकाच्या प्रभागातून या उमेदवारांना विजय मिळाला; पण चार जणांचे पूर्ण पॅनल निवडून आले नाही.
निवडणुकीची भिस्त जशी संजय शिरसाट यांच्यावर होती तशीच ती आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावरदेखील होती. परंतु हे दोन्हीही नेते आपल्या मुलाला आणि मुलीला विजयी करण्यात गुंतल्यामुळे अन्य उमेदवारांना बळ देण्यात ते कमी पडल्याचे मानले जाते. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला झालेली जेमतेम गर्दी आणि त्यावरून त्यांनी संबंधितांची केलेली कानउघाडणी यानंतर पक्षाचे स्थानिक नेते काही बोध घेतील असे कार्यकर्त्यांना वाटत होते; पण त्यांचे हे वाटणे फोल ठरले. ९७ जागा लढवून केवळ तेरा जागी या पक्षाचे उमेदवार विजयी होऊ शकले आहेत. महापालिकेत भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. बहुमतासाठी केवळ एक मत भाजपला कमी आहे. शिवसेनेला सोबत न घेण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने केल्यास उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती ही पदे शिवसेनेच्या पदरात पडणार नाहीत. एमआयएमचे ३३ नगरसेवक निवडून आल्यामुळे विरोधी पक्षनेता याच पक्षाचा असेल. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis