
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गवरील सर्व टोल प्लाझांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद होणार असून वाहनचालकांना टोल भरण्यासाठी फक्त फास्टॅग किंवा यूपीआय पेमेंटचा वापर करावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या देशातील 25 टोल प्लाझांवर या ‘नो-स्टॉप’ प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामागील मुख्य उद्देश टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांब रांगा कमी करणे आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक जलद व अडथळामुक्त करणे हा आहे. सध्या फास्टॅग अनिवार्य असतानाही अनेक ठिकाणी रोख व्यवहार सुरू असल्याने वाहतूक कोंडी कायम राहते. रोख व्यवहार बंद झाल्यानंतर वाहनांना टोल बूथवर थांबण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
सरकारच्या या पावलामुळे इंधनाचीही बचत होणार आहे, कारण टोल प्लाझांवर वाहनं थांबवणे व पुन्हा सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल वाया जाते. तसेच सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात नोंदवले जाणार असल्याने टोल वसुलीत पारदर्शकता वाढेल आणि गैरव्यवहाराची शक्यता कमी होईल. सुट्या पैशांसाठी होणारे वाद, मॅन्युअल पावत्या आणि अनावश्यक वेळेचा अपव्ययही टळणार आहे.
रोख पेमेंट बंद करण्याचा निर्णय हा देशातील ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ प्रणालीकडे टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. भविष्यात महामार्गांवर कोणतेही फिजिकल टोल नाके नसतील, तर कॅमेरे आणि सेन्सर्सच्या मदतीने वाहने चालू असतानाच टोल आपोआप कापला जाईल. नवीन नियम लागू होण्यापूर्वी वाहनचालकांना त्यांचे फास्टॅग खाते सक्रिय ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फास्टॅग नसल्यास स्मार्टफोनमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू असल्याची खात्री करावी. 1 एप्रिलनंतर डिजिटल पेमेंटशिवाय टोल प्लाझावर पोहोचल्यास दंड आकारला जाऊ शकतो किंवा वाहन परत पाठवले जाऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत. अधिकृत नियमावली लवकरच जाहीर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule