
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.)।
जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४१ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत शहराच्या राजकारणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. हा विजय केवळ महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उभारलेला भक्कम राजकीय पाया आहे, असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
लोणीकर म्हणाले की,“हा विजय कोणत्याही एका नेत्याचा नाही, तर संघटनेचा आहे. बूथ पातळीवर आखलेली रणनीती, प्रत्येक कार्यकर्त्याने दिलेली झुंज आणि नेतृत्वाने दिलेली दिशा – या तिन्हींच्या जोरावरच हा निकाल लागला आहे.” महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय हा बूथ पातळीवरील नियोजनाचा भाग आहे. मतदार याद्यांची बारकाईने तपासणी, प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचण्याची योजना, घराघरात संवाद, प्रचारातील शिस्त आणि मतदान दिवशीची अचूक यंत्रणा – या प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केले असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली, वेळेची आणि श्रमांची कोणतीही तडजोड केली नाही, त्यामुळेच भाजपाला प्रत्येक प्रभागात निर्णायक आघाडी मिळाली. या विजयामागे राज्य पातळीवरील नेतृत्वाचे देखील ठोस पाठबळ असल्याचे लोणीकर यांनी अधोरेखित केले.
जिल्ह्यातील भाजपाच्या नेतृत्वातील एकजूट अधोरेखित करत लोणीकर म्हणाले, रावसाहेब दानवे आणि माझी जोडी ही जय–वीरूसारखी आहे. दानवे–लोणीकर–गोरंट्याल आणि आम्ही सर्वजण एकत्र, ताकदीने आणि स्पष्ट राजकीय भूमिकेसह काम करत आहोत. पण या सगळ्या नेतृत्वाला खरी ताकद देणारा घटक म्हणजे आमचा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांच्या कार्य कुशलतेच्या बळावर भारतीय जनता पक्षाचा महापौर जालना महानगरपालिकेमध्ये बसवतो आहोत. महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले की,
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्व सभापती हे भारतीय जनता पक्षाचेच असतील. ही सत्ता जनतेच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis