
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'नांदेड'च्या प्रचाराकडे पाठ फिरविल्याचा परिणाम
नांदेड, 17 जानेवारी (हिं.स.)।नांदेड महानगरपालिकेच्या सार्वत्रिकनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आपली 'घडी' निट बसवू शकला नाही. च'घड्याळी'चा गजर केवळ दोन जागावरच थांबला आहे. पक्षाचे स्थानिक नेते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मनपाच्या या निवडणुकीत थेट सत्ता स्थापन करण्याचे 'स्वप्न' पाहिले होते. मात्र निवडणुक निकालातून ते धुळीस मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) पक्षात युती झाली होती. परंतु युती करुन लढत असताना देखील या पक्षाला अपेक्षित यश साध्य करता आले नाही. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. उमेदवार निश्चित करण्यापासून ते प्रचाराचीधूरा सांभाळण्यापर्यंतचे त्यांच्याच हाती होते. प्रचार कालावधीतील टीका- टिप्पणी अन् आरोप-प्रत्यारोप पाहता, ही निवडणुक भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रतापराव पाटील
चिखलीकर यांच्यातच आहे! असे वातावरण जणू दिसू लागले होते. उभय नेते एक-दुसऱ्याचा 'समाचार' घेण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यामुळे निवडणुकीत रंग भरला गेला होता. मात्र आ. चिखलीकरांच्या रंगाचा आता 'भंग' झाला आहे. 'यदाकदा गरज पडली तरी भाजपाची साथ घेणार नाही, अन्य पक्षांचा विचार करेन' असे निर्धाराने सांगणाऱ्या आ. चिखलीकरांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत याआधीहीआ. चिखलीकर यांच्या नेतृत्वाचा 'चमत्कार' फार चालला नाही हा पूर्वइतिहास आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा नव्याने झाली असे म्हणावे लागेल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या दोन तर त्यांच्या कन्या ना. आदिती तटकरे यांची एक सभा झाली. परंतु या सभेचा प्रभाव या निवडणुकीत पडू शकला नाही. या उलट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'नांदेड'च्या प्रचाराकडे पाठ फिरविल्याचा परिणाम मात्र अधिक पडला ! असे म्हणावयासही बराच वाव आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis