
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 7 फेब्रुवारी पर्यंत) निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम दि. 13 जानेवारी रोजी घोषित केला. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिले आहेत, जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी