एकाचवेळी ३ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘एक लक्ष वेळा अथर्वशीर्ष पठण’
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।श्री गणेश जयंतीच्या पवित्र निमित्ताने अकोल्यात सलग दुसऱ्या वर्षी एक भव्य व भक्तिमय धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती नगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता तब्बल ३,०
एकाचवेळी ३ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘एक लक्ष वेळा अथर्वशीर्ष पठण’


अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।श्री गणेश जयंतीच्या पवित्र निमित्ताने अकोल्यात सलग दुसऱ्या वर्षी एक भव्य व भक्तिमय धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती नगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता तब्बल ३,००० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून “एक लक्ष वेळा अथर्वशीर्ष पठण” करण्यात येणार आहे. मागील वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा हा उपक्रम अधिक व्यापक व नियोजनबद्ध स्वरूपात राबविण्यात येत आहे.

गणेश जयंती, ज्याला माघ शुद्ध चतुर्थी असेही म्हणतात, हा भगवान गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. विघ्नहर्ता, बुद्धीदाता आणि मंगलमूर्ती गणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील काही भागांत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा, आरती, भजन, हवन तसेच विविध धार्मिक विधी पार पडतात.यंदा गणेश जयंतीच्या निमित्ताने होणारा हा उपक्रम धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, शिस्त, एकाग्रता आणि संस्कार रुजण्यास मदत होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे. एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून होणारे अथर्वशीर्ष पठण संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन टाकणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन निलेश देव मित्र मंडळ, अकोला, भारत शिक्षक प्रसारक मंडळ, अकोला आणि श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्था एकत्रितपणे कार्यरत असून, विविध समित्यांच्या माध्यमातून तयारी अंतिम टप्प्यात आहे.या उपक्रमासाठी ऍड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे, गणेश जयंतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि समाजात एकोप्याची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सलग दुसऱ्या वर्षी होत असलेल्या या भव्य गणेश जयंती उत्सवाबाबत अकोल्यातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या पवित्र उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आयोजन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या उपस्थितीने व सहभागाने हा उपक्रम अधिक भव्य, दिव्य आणि यशस्वी करावा, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande