
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी) यांच्या वतीने लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात कुणबी भवन तालुका कार्यालयाच्या उद्घाटनासह विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. सुजित झिमण, विवेक सावंत, रामभाऊ गराटे, नैकर गाजी, शांताराम मालप, युवा अध्यक्ष अॅड. सागर कळंबटे, महिला अध्यक्षा विनया गावडे, सौ. साक्षी रावणंग, अॅड. संदीप ढवळ, श्रीकांत मांडवकर, प्रदीप घडशी, डॉ. दिलीप नागवेकर, गजानन धनावडे, शांताराम खापरे, अॅड. अवधूत कळंबटे, शशिकांत बारगुडे, नगरसेवक गणेश भारती, साजन गिजबिले यांच्यासह अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जे. के. फाइल्सजवळ रम्य नगर येथील कुणबी भवनात कुणबी समाजोन्नती संघाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच समाजातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी वसतिगृहातील मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समाज संघटनेच्या माध्यमातून लोकनेते शामराव पेजे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी