
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.) । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या प्राणघातक हल्ल्यात झालेल्या हत्येनंतर अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येमागे स्थानिक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष बदरुज्जामा, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी राजू बोचे, संजय बोडखे, फाजिल खान आणि फारूक खान यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. हिदायत पटेल यांनी मृत्यूपूर्वी या संशयितांची नावे आपल्याला सांगितली होती, असा दावा त्यांच्या पुतण्याने केला आहे.
या गंभीर आरोपांची दखल घेत काँग्रेस पक्षाने तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी संजय बोडखे आणि राजू बोचे यांना पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनी पत्राद्वारे ही कारवाई जाहीर करत, संबंधित दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने निलंबन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.काँग्रेसने आपल्या दोन पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष बदरुज्जामा यांच्यावर पक्षाकडून कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे