
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे भोजन, वसतिगृह अनुदान वितरणाबाबतचे प्रश्न गंभीर होत आहेत. तीन तारखेपासून विविध वसतिगृहांना भेट देत, विद्यार्थ्यांशी संवाद साधत, या प्रश्नांबाबत राज्यभर लढा उभारण्याचा निर्णय स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) राज्य कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
संघटनेच्या राज्य कमिटीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
राज्याची शैक्षणिक स्थिती चिंताजनक वळणावर उभी आहे. जिल्हा परिषद शाळांनी पिढ्यानपिढ्या घडवल्या, तिथेच आज 'शाळाबंदी'चे सावट पसरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हजारो शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. मराठी शाळा बंद करण्याचे संकट ओढवले आहे. तसेच आदिवासी, दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांतील मूलभूत सोयी धोक्यात आल्या असल्याची माहिती आहे.
या प्रश्नांबाबत आगामी काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या अशा आहेत मागण्या 'शाळाबंदीचा निर्णय रद्द करा, पटसंख्येची अट न ठेवता, दुर्गम भागातील एक जरी विद्यार्थी असेल तरी तिथे शाळा सुरूच राहिली पाहिजे', 'समाजकल्याण वसतिगृहातील भोजन, वसतिगृह अनुदानाचे प्रश्न तत्काळ सोडवा', 'विविध समाज घटकांतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या वेळेवर द्या', 'विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापक भरती करा', 'कंत्राटी भरती बंद करून कायमस्वरूपी आणि प्रशिक्षित शिक्षकांची पदे भरा', 'शिक्षकांना मुलांना शिकवू द्या, अतिरिक्त अशैक्षणिक कामे शिक्षकांना देणे बंद करा', 'शाळांमधील पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करा', 'डिजिटल साक्षरता, वीज आणि इंटरनेटसह उपलब्ध करा' आदी मागण्या करण्यात आल्या. विद्यार्थी आणि शिक्षणाच्या संबंधाने विविध प्रश्नांवर चर्चा बैठकीत झाली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis