
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्यासह नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रमुख अजेंड्यावर असेल अशी चिन्हे आहेत. प्रशासकांच्या काळात पाच ते साडेपाच वर्षांच्या काळात झालेल्या कामांवरदेखील नगरसेवक लक्ष केंद्रीत करतील असे दिसून येते.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. एमआयएम पक्षाचे ३३, शिवसेनेचे १३, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सहा तर वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेल्यांपैकी भाजपकडे सर्वाधिक अनुभवी नगरसेवक आहेत. त्याखालोखाल शिवसेनेकडे चार,एमआयएमकडे देखील चार अनुभवी नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे तीन अनुभवी नगरसेवकांची संख्या आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर निवडून आलेल्या महापौरांच्या आदेशाने जी पहिली सर्वसाधारण सभा होईल त्यात शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा होऊ शकेल छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा ३३ वर्षांनी तयार झालेला असला तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. विकास आराखड्यातील एकूणच घोळावर पहिल्याच सर्वसाधारण सभेत चर्चा घडवून आणून प्रशासनाला खिंडीत पकडण्याचे काम केले जाऊ शकते.
पालिकेत प्रशासकांचा कारभार होता. या काळात करण्यात आलेली कामे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या रडारवर असतील असे मानले जात आहे. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर देखील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चर्चा होऊ शकते. पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या करण्यात येत माध्यमातून असल्यामुळे आणि या कामात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निर्बंध घातल्यामुळे केवळ चर्चेशिवाय नगरसेवकांना पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल काही करता येणार नाही.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis