नाशिक- देशातील पहिल्या वकील अकॅडमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावेंची निवड
The-countrys-
नाशिक- देशातील पहिल्या वकील अकॅडमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावेंची निवड


नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)महाराष्ट्र-गोवा राज्य बार कौन्सिल (BCMG) चे सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांची महाराष्ट्र-गोवा राज्य बार कौन्सिल द्वारे स्थापित देशातील पहिली वकील अकॅडमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण व संशोधन संस्था, तळोजा, नवी मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. संग्राम देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीबाबत कायद्याच्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या अकॅडमीचा उद्देश फक्त वकिलांना प्रशिक्षण देणे नाही, तर देशभरातील कायद्याच्या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी संशोधन, कार्यशाळा, कौशल्य विकास आणि व्यावहारिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आहे.

महाराष्ट्र-गोवा राज्य बार कौन्सिल द्वारे स्थापित ही देशातील पहिली वकील अकॅडमी नवीन पिढीच्या वकिलांसाठी तसेच विविध शासकीय अधिकारी, न्यायालयीन अधिकारी आणि संबंधित व्यावसायिकांसाठी आधुनिक कायदेशीर कौशल्ये विकसित करण्याचे कार्य करणार आहे. यात कायदेशीर ज्ञानाची सखोलता, व्यावसायिक नीतिमत्ता, केस मॅनेजमेंट कौशल्ये, संशोधन क्षमता आणि सामाजिक जबाबदारी यांचा समावेश असेल.

संस्थेत राबविण्यात येणाऱ्या कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि संशोधन उपक्रमांद्वारे देशभरातील कायद्याच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना नवीन पद्धती, आधुनिक न्यायालयीन तंत्रज्ञान आणि प्रगत व्यावहारिक अनुभव मिळण्याची संधी मिळणार आहे. हे उपक्रम कायदा शिक्षण, व्यावसायिक विकास आणि न्यायव्यवस्थेच्या सुधारणा यामध्ये महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ऍड. जयंत जायभावे यांच्या नेतृत्वाखाली आणि अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्या सहकार्याने ही संस्था कायद्याच्या क्षेत्रात नवीन दृष्टिकोन आणि गुणवत्ता यांचे एक आदर्श उदाहरण बनेल, असे कायदा तज्ज्ञ सांगतात. दोघांनाही निवडीसाठी कायद्याच्या व्यावसायिक आणि शासकीय स्तरावर मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.ही निवड देशातील वकील प्रशिक्षण व संशोधन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करणारी असून, भविष्यात या अकॅडमीच्या माध्यमातून कायद्याच्या क्षेत्रातील व्यावसायिक क्षमतेत वाढ, न्यायप्रणाली तील पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा विस्तार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande