
कोल्हापूर, 19 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची जिल्हा परिषदेबाबत पहिली एकत्रित बैठक यासाठी पार पडली. या बैठकीनंतर भाजप एकूण जागा किती लढणार याबाबत प्राथमिक अंदाज समोर आला आहे. जवळपास 35 ते 40 जागावर भाजपने लढण्याची तयारी दर्शवली आहे. महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदिप नरके, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक हे नेते उपस्थित होते.
तसेच या बैठकीला जनसुराज्यचे नेते समित कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि इतरही काही पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा आढावा घेतला. या चर्चेमधूनच भाजपच्या जगाबाबतचा फॉर्मुला समोर आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 68 जागांपैकी शक्य असेल तिथे महायुती म्हणून लढण्यावर भर दिला जाणार आहे. शक्य नसेल तिथे जास्तीत जास्त पक्ष एकत्र घेऊन लढत करावी. मात्र काँग्रेस सोबत युती करायची नाही अशा सूचना मंत्री पाटील यांनी केलेल्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये भाजपने 35 ते 40 जागांवर लढण्याची तयारी ठेवली आहे. कोअर कमिटीच्या 40 जागांची मागणी देखील भाजपकडून करण्यात आली आहे. या जागा मतदारसंघाच्या विविध भागातील ताकदीनुसार ठरवल्या जाणार आहेत. मतदार संघाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीनुसार या जागा वाटप होतील. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं, महायुती म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर प्रत्येकाने भर द्यावा असं आवाहन पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी अमल महाडिक, करवीरसाठी आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगले आणि इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे , पन्हाळामध्ये आमदार विनय कोरे, चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील हे त्या त्या भागातील नेतृत्व करतील. या सगळ्यांना मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांचं मार्गदर्शन देखील असणार आहे. लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर झाल्यानंतर या जागांवर शिक्कामोर्तब होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar