
सत्तेसाठी अडीच वर्षांचे उपमहापौरपद व स्थायी समिती सभापतीपदाची अट
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)
अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ रुक्मिणीनगर–फ्रेजरपुरा येथील तिन्ही जागांवर विजय मिळवत बहुजन समाज पार्टीने (बसपा) आपली ताकद सिद्ध केली असून सध्या मनपात बसपा निर्णायक म्हणजेच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आली आहे. वाढलेल्या राजकीय महत्त्वाची जाणीव ठेवत बसपाने सत्तेत सहभागी होण्यासाठी स्पष्ट आणि ठोस अटी समोर ठेवल्या आहेत. अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी उपमहापौरपद तसेच एका पूर्ण कार्यकाळासाठी स्थायी समितीचे सभापतीपद देण्यात यावे, अशी मागणी बसपाकडून करण्यात आली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होते की, बसपाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला अमरावती मनपात सत्ता स्थापन करणे शक्य नाही. ८७ सदस्यीय महापालिकेत बहुमतासाठी ४४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर २५ जागा मिळवलेल्या भाजपाबरोबरच काँग्रेस, युवा स्वाभिमान पक्षानेही बसपाच्या स्थानिक नेतृत्वाशी संपर्क साधून पाठिंब्याची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) जर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसजवळ गेली, तर दुसरे सत्ता-समीकरण उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, भाजपाच्या सत्तास्थापनेच्या स्वप्नांना युवा स्वाभिमान पक्षाने मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. ‘मोठा भाऊ’ म्हणत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याची दबक्या आवाजातील चर्चा सुरू असून, भाजप महापौरपदाच्या प्रश्नावर नेमका कोणता तोडगा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी