मुंबई मनपा : मनसेत नाराजीनाट्य, 11 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
मुंबई, २ जानेवारी (हिं.स.) : मुंबईतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्रेतील प्रभाग 97 हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग 98 मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा नि
राज ठाकरे


मुंबई, २ जानेवारी (हिं.स.) : मुंबईतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्रेतील प्रभाग 97 हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग 98 मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. प्रामुख्याने विभाग पातळीवरील अंतर्गत नाराजी या राजीनामा सत्रामागे असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान मनसेच्या वांद्रे परिसरात पक्ष स्थापनेपासून म्हणजेच तब्बल १९ वर्षांहून अधिक काळ पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ११ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर जागावाटपाची समीकरणे बदलली आहेत. वांद्रे येथील उपरोक्त दोन प्रभागांपैकी एक जागा शिवसेना उबाठा गटाकडे गेली आहे, तर दुसरी जागा मनसेच्या दीपिका काळजे यांना देण्यात आली आहे. जागावाटपात आपल्या विभागातील कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना किंवा उमेदवारी देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने ही टोकाची भूमिका घेतली गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ११ नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणार की वांद्र्यासाठी नवीन फळी उभी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मनसेला वॉर्ड क्रमांक 97 मध्ये भाजपाकडून खिंडार पाडण्यात आले आहे. मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे नाराज असलेल्या जुन्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

मनसेच्या स्थापनेपासून हे पदाधिकारी पक्षासोबत होते. अनेक वर्षे निष्ठावंत कार्यकर्ते मनसेसाठी काम करत होते, परंतु उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मशाल चिन्हावर उमेदवारी दिल्याने मनसेच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. भाजपाकडून वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला रिंगणात आहेत, तर बाळा चव्हाण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande