
नवी दिल्ली,02 जानेवारी (हिं.स.) : दिल्ली-एनसीआर परिसरातील वायु गुणवत्तेत लक्षणीय सुधार झाल्याने वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) मोठा निर्णय घेतला आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (जीआरएपी) अंतर्गत स्टेज-3 मधील सर्व निर्बंध तात्काळ प्रभावाने हटवण्यात आले आहेत.
दिल्लीच्या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये (एक्यूआय) मोठी घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीचा एक्यूआय गुरुवारी 380 इतका होता. त्यात आज, शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत घट होऊन 236 झाला. यामुळे राजधानीतील हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीतून ‘खराब’ श्रेणीत आली आहे. सीएक्यूएमच्या उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार, गैर-आवश्यक बांधकाम, खाणकाम, डिझेल जनरेटरचा वापर तसेच बीएस-III आणि बीएस-IV वाहनांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, जीआरएपी स्टेज-1 आणि स्टेज-2 अंतर्गत लागू असलेले उपाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. यामध्ये रस्त्यांची यांत्रिक सफाई, कचरा जाळण्यावर बंदी आणि औद्योगिक प्रदूषण नियंत्रणाच्या उपायांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वायु गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थिती बिघडल्यास पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. नागरिकांनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाऱ्याची दिशा बदलणे आणि वेग वाढल्याने राजधानीतील हवामानात थोडा बदल जाणवला. सकाळी दाट धुके आणि कोहऱ्याचे वातावरण होते, तर दिवसभर अनेक भागांत स्मॉगची चादर पसरलेली दिसून आली. त्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी झाली होती. एनसीआरमधील शहरांमध्ये गाझियाबादची हवा सर्वाधिक प्रदूषित राहिली असून येथे एक्यूआय 239 नोंदवण्यात आला. ग्रेटर नोएडा (238), नोएडा (229) आणि फरीदाबाद (210) या शहरांमध्येही हवा ‘खराब’ श्रेणीत होती. याउलट, गुरुग्राममध्ये एक्यूआय 187 नोंदवण्यात आला असून येथे हवा ‘मध्यम’ श्रेणीत होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिशेने ताशी 5 किमी वेगाने वारे वाहत होते. दुपारी पीएम10 चे प्रमाण 183.5 तर पीएम 2.5 चे प्रमाण 111.3 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर नोंदवण्यात आले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी