
नवी दिल्ली , 02 जानेवारी (हिं.स.)।दहशतवादाविरुद्ध भारत आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करेल आणि भारत आपल्या संरक्षणासाठी काय करावे किंवा काय करू नये, हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही दुसऱ्या देशाला नाही, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी दिलेल्या एका निवेदनात सांगितले. आयआयटी मद्रास येथे आयोजित ‘शस्त्र २०२६ – आयआयटी मद्रास टेक्नो-एंटरटेनमेंट फेस्ट’च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. भारताच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल, ते सर्व केले जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जयशंकर म्हणाले, “तुमचे शेजारी देश वाईटही असू शकतात. पश्चिमेकडे पाहिले तर दुर्दैवाने आमच्याबाबतीतही तसेच आहे. एखादा देश जाणीवपूर्वक आणि सातत्याने दहशतवाद पसरवत असेल, तर दहशतवादाविरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार आमच्याकडेही आहे आणि आम्ही तो वापरू. मात्र तो अधिकार कसा वापरायचा, हे ठरवण्याचा निर्णय आमचा आहे. आम्ही काय करावे किंवा काय करू नये, हे कोणीही आम्हाला सांगू शकत नाही. आपल्या सुरक्षेसाठी जे करणे आवश्यक आहे, ते आम्ही नक्कीच करू.”
परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले, “काही वर्षांपूर्वी आम्ही जलवाटपाच्या करारावर सहमती दर्शवली होती. पण जर तुम्ही दशकानुदशके दहशतवाद पसरवत असाल, तर ते चांगल्या शेजारधर्माचे लक्षण नाही. आणि जर तुम्ही चांगले शेजारी नसाल, तर त्याचे फायदेही तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही एकीकडे ‘कृपया आमच्यासोबत पाणी वाटून घ्या’ असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे दहशतवाद सुरू ठेवू शकत नाही. हे शक्य नाही.”
डॉ. जयशंकर यांनी सांगितले की, “आपण शेजारी देशांकडे पाहिले, तर जे देश भारताशी चांगले संबंध ठेवतात, तिथे भारत गुंतवणूक करतो, मदत करतो. कोरोनाच्या काळातही शेजारी देशांना सर्वात आधी लस पुरवण्याचे काम भारतानेच केले. श्रीलंका आर्थिक संकटात सापडला असताना भारतानेच त्याला मदत करत चार अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली. आमचे बहुतेक शेजारी देश मानतात की भारताचा विकास त्यांच्यासाठीही फायदेशीर आहे. भारत प्रगती करेल, तर आमचे शेजारी देशही आमच्यासोबत पुढे जातील. हीच गोष्ट मी बांगलादेशबाबतही सांगू इच्छितो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode