
नाशिक, 02 जानेवारी (हिं.स.)।
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गुरुवारी सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याने साबळे कुटुंबीय भारावले होते.
हिरामण शंकर साबळे यांचे गावात साधे घर आहे. त्यांच्या घरी राज्यपाल जेवणाला येणार, अशी माहिती मिळताच त्यांनी तयारी सुरू केली. घराला रंग रंगोटी केली. प्रवेशद्वाराच्या भिंती वारली चित्रकलेने साकारली होती. साबळे कुटुंबातील गोजरताईने राज्यपालांसाठी लाल, पांढरी नागली आणि बाजरीच्या भाकरी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी, हरभराची भाजी, उडीदाचे वरण तयार केले होते.
राज्यपाल देवव्रत यांच्यासमवेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ , विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांच्यासह साबळे कुटुंबातील सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी स्थानिक पिके, जीवनमान या विषयी माहिती घेतली.
राज्यपाल देवव्रत यांनी आमच्या घरी जेवण केले. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे साबळे कुटुंबातील सदस्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV