
वॉशिंग्टन, 20 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवण्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये ते ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा ध्वज रोवताना दिसत आहेत. हे छायाचित्र समोर आल्यानंतर डेन्मार्कसह युरोपातील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.याचसोबत त्यांनी असा एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये ग्रीनलँड, कॅनडा आणि व्हेनेझुएला हे अमेरिकेच्या भूभागाचा भाग असल्याप्रमाणे दाखवण्यात आले आहे. या कृतीनंतर अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक छायाचित्र शेअर केले असून, त्यामध्ये ते उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा ध्वज रोवताना दिसत आहेत. जवळच असलेल्या फलकावर “ग्रीनलँड, अमेरिकन प्रदेश, २०२६.”लिहिले आहे –
आणखी एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे, त्यामध्ये नाटोमधील अनेक नेते ओव्हल ऑफिसमध्ये बसलेले दिसतात. या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बदललेल्या नकाशामध्ये ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग म्हणून दर्शवण्यात आले आहे. या छायाचित्रात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन यांचा समावेश आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, ग्रीनलँडच्या मुद्द्यावर युरोपीय संघ फारसा विरोध करणार नाही. फ्लोरिडामध्ये भाषण करताना त्यांनी सांगितले की, रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच डेन्मार्ककडे ग्रीनलँडचे संरक्षण करण्याची पुरेशी क्षमता नसल्याचेही त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्हाला हे हवे आहे आणि हे घडलेच पाहिजे.” ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.याआधी ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या या प्रदेशासंबंधीच्या आपल्या मागणीचा संबंध नोबेल शांतता पुरस्काराशीही जोडला होता. नॉर्वेच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले होते की, अद्याप त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. तसेच अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत स्थितीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
एका अन्य पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की, ग्रीनलँडच्या मुद्द्यावर नाटोचे महासचिव मार्क रुटे यांच्याशी त्यांची दूरध्वनीवर “अतिशय चांगली चर्चा” झाली आहे. त्यांनी लिहिले की, ग्रीनलँड राष्ट्रीय तसेच जागतिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि या मुद्द्यावर कोणतीही माघार घेता येणार नाही.
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात लष्कर अधिक बळकट करण्यात आले आणि ही प्रक्रिया आता आणखी वेगाने सुरू असल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या मते, सामर्थ्याच्या माध्यमातूनच जगात शांतता प्रस्थापित करता येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode