
गडचिरोली., 21 जानेवारी (हिं.स.)
आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील नागामाता मंदिराजवळ झालेल्या थरारक हत्या प्रकरणाचा अहेरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा नागेपल्ली येथील रहिवासी रविंद्र तंगडपल्लीवार (५० वर्षे) हे १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 'प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली' येथे आरडीचे पैसे भरण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतरही पत्ता न लागल्याने अहेरी पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची (मिसिंग) तक्रार दाखल करण्यात आली होती.
जंगलात आढळला मृतदेह
१९ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आलापल्ली ते सिरोंचा महामार्गावरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासणीअंती हा मृतदेह बेपत्ता रविंद्र तंगडपल्लीवार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर वार करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली होती.
असा लागला छडा
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. कार्तिक मदीरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
तपासाच्या सुरुवातीला आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त खबऱ्यांच्या जाळ्याचा प्रभावी वापर केला. संशयावरून समय्या मलय्या सुंकरी (३५ वर्षे, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीला पोलीस कोठडी
पोलिसांनी २० जानेवारी रोजी आरोपीला रीतसर अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपीची २८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond