अकोला : भाजपविरोधी आघाडीसाठी काँग्रेसचे आक्रमक प्रयत्न
अकोला, 21 जानेवारी (हिं.स.) :अकोला महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ला उधाण आले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताच्या जादुई आकड्यापासून तो अद्याप तीन जागा दूर आहे. या पा
Photo


अकोला, 21 जानेवारी (हिं.स.) :अकोला महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ला उधाण आले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताच्या जादुई आकड्यापासून तो अद्याप तीन जागा दूर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक हालचाली सुरू केल्या असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) मोठा प्रस्ताव दिला आहे.

“काँग्रेसला कोणतेही पद नको. भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करावी,” असे स्पष्ट आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सर्व संबंधित पक्षांशी चर्चा सुरू असून अकोला महापालिकेत लवकरच सत्तास्थापना होईल, असा ठाम दावाही त्यांनी केला.

महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याशी बैठक घेतली असून, आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. यामुळे भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भाजप सत्तास्थापनेचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात भाजपकडे कोणत्याही पक्षाचा अथवा अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपकडे केवळ 38 नगरसेवक असून बहुमतासाठी आवश्यक असलेला पाठिंबा अद्याप मिळालेला नाही. “भाजपकडून उगाचच अपक्ष व अन्य पक्षांचे नगरसेवक संपर्कात असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत,” असा टोला आमदार पठाण यांनी लगावला.

दरम्यान, अकोला महापालिकेतील सध्याची पक्षीय स्थिती पुढीलप्रमाणे आहे

एकूण जागा : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा (ठाकरे शिवसेना) : 6

शिंदे शिवसेना : 1

अजित पवार राष्ट्रवादी : 1

शरद पवार राष्ट्रवादी : 3

वंचित बहुजन आघाडी : 5

एमआयएम : 3

अपक्ष : 2

या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande