पालघर - ‘सरस’ची भक्कम उंची; ५ दिवसांत १ कोटी १० लाखांहून अधिक विक्री
पालघर, 17 मार्च (हिं.स.)१२ ते १६ मार्च या कालावधीत विरार येथे आयोजित ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ने ग्रामीण महिला स्वयंसहायता बचत गटांच्या कर्तृत्वाला भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत विक्रीचे नवे विक्रम नोंदवले. अवघ्या पाच दिवसांत जिल्हा परिषद पा
महिलांच्या कर्तृत्वाला ‘सरस’ची भक्कम उंची; ५ दिवसांत १ कोटी १० लाखांहून अधिक विक्री


पालघर, 17 मार्च (हिं.स.)१२ ते १६ मार्च या कालावधीत विरार येथे आयोजित ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ने ग्रामीण महिला स्वयंसहायता बचत गटांच्या कर्तृत्वाला भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत विक्रीचे नवे विक्रम नोंदवले. अवघ्या पाच दिवसांत जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त माध्यमातून तब्बल १ कोटी १० लाख ६४० रुपयांची उलाढाल झाली असून, या महोत्सवाने महिला सक्षमीकरणाला नवी दिशा दिली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषद पालघरमार्फत ८९ लाख १२ हजार २० रुपये, तर वसई-विरार महानगरपालिकेच्या (NULM) माध्यमातून २० लाख ८८ हजार ६२० रुपये इतकी विक्री नोंदविण्यात आली असून, या दोन्हींची एकत्रित विक्री १,१०,००,६४० रुपये इतकी झाली आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिला बचत गट कोटीचा टप्पा पार करतील, हा विश्वास महिलांनी प्रत्यक्षात उतरवत उल्लेखनीय कामगिरी केली.

जिल्हा परिषदेचे सीईओ मनोज रानडे, अप्पर आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे तसेच प्रकल्प संचालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा संपन्न झाला.

महोत्सवात विविध स्टॉल्समधून महिलांनी सादर केलेले मसाले, घरगुती खाद्यपदार्थ, पापड, लोणची, मिठाई, चॉकलेट, आर्टिफिशियल ज्वेलरी, बांबू व लाकडी उत्पादने, फुले-तोराण तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी मिळाली. काही बचत गटांनी उत्कृष्ट मांडणी आणि विक्रीत आघाडी घेत विशेष ठसा उमटवला.

या महोत्सवातून अनेक महिला बचत गटांना नव्या व्यावसायिक संधीही उपलब्ध झाल्या. वाडा कोलम तांदूळ, बेसन, शेवया तसेच मोरिंगा पावडर या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळाल्या असून, ग्रामीण उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला आहे. तसेच DMart चे व्यवस्थापक नायडू यांनीही महोत्सवाला भेट देत विविध उत्पादनांची पाहणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande