
रायगड, 17 मार्च, (हिं.स.)। “पाणी नाही, तर जगायचं कसं?” — नेरळमध्ये सध्या नागरिकांचा हा संतप्त सवाल ऐकू येत आहे. वीज बिल थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव अक्षरशः तहानले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळ कोरडे पडले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. “वेळेवर बिल भरले नाही, आणि त्याची शिक्षा आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे.
या गंभीर प्रश्नावर शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप नारायण उतेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत तातडीची ग्रामसभा बोलावण्याची मागणी केली आहे. “पाणी हा मूलभूत हक्क आहे, त्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायत प्रशासकांनी धाव घेत बीडीओ (गटविकास अधिकारी) यांच्याकडे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. प्रलंबित रक्कम तातडीने एमएसईबीकडे जमा करून वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, अजूनही पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. “लवकर पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर रस्त्यावर उतरू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नेरळमध्ये निर्माण झालेली ही भीषण परिस्थिती प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून, येत्या काही तासांत ठोस निर्णय न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)