
अकोला, 21 जानेवारी (हिं.स.) । अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली घडलेल्या गवळी समाज नेते किसनराव हुंडीवाले यांच्या निर्घृण हत्याकांडाचा निकाल तब्बल सात वर्षांनंतर लागला आहे. अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 15 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. तपासात उघड झाले की या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग देखील होता. आरोपींनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करून त्यांची हत्या केली, हे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण 22 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
किशनराव हुंडीवाले हे 6 मे 2019 रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास त्यांची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात 15 आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रथम तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला, त्यानंतर शहर उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील आणि पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत हजारांहून अधिक कागदपत्रांची आरोपपत्र न्यायालयात दाखल केली.
सुनावणीदरम्यान पाच आरोपींच्या सहभागाबाबत ठोस पुरावे न मिळाल्याने प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपी:-
विक्रम श्रीराम गावंडे, श्रीराम गावंडे, धीरज गावंडे, रणजीत गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर अहिर आणि सूरज गावंडे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे