
अकोला, 21 जानेवारी, (हिं.स.)। अकोला महापालिकेच्या सत्ता स्थापने वरून आता घमासान झाल्याचं पाहायला मिळत आहे. उबाठा गट आणि भाजपची सत्ता स्थापनेसाठी बोलणी झाल्याची चर्चा होती. उबाठा कडून केलेल्या प्रस्तावाला मात्र भाजपने दुजोरा दिला नाही.
अकोला महापालिकेची निवडणूक पार पडली, आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात उबाठा गटाला भाजपकडून फोन गेल्याची चर्चा सुरू होती. त्याला भाजपने दुजोरा दिला आहे. दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापने साठी एकत्र येण्यासाठी उबाठा गटाने काही नागरी सुविधेचे प्रस्ताव भाजपकडे मांडले होते. मात्र भाजपकडून अजूनही कोणतंच उत्तर उबाठाला मिळालं नसल्याचं उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास आम्ही भाजप सोबत जाऊ असंही नितीन देशमुखांनी सांगितलं आहे.
उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या सोबत चर्चा झाल्याचं भाजपचे अकोला महानगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी मान्य केलं आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत फक्त पदांबाबत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मात्र नागरी सुविधांच्या प्रस्तावबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे. उबाठाने पदाबाबत बोलताना उपमहापौर पदाची मागणी केली , पण भाजपने ही मागणी धुडकावून लावली आहे. नागरी सुविधांबाबत उबाठा करत असलेली मागणी, हा विकासाचा मुद्दा आहे. आणि हे काम आधीच भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून सुरू असल्याचही विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षीय बलाबल
भाजप 38
उबाठा 6
शरद पवार 3
अजित पवार 1
शिंदे सेना 1
वंचित बहुजन आघाडी 5
एमआयएम 3
अपक्ष 1
महानगर विकास फ्रंट 1
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे