
जळगाव, 21 जानेवारी, (हिं.स.) - लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली दोन तरुणांकडून प्रत्येकी एक लाख ७० हजार रुपये स्वीकारूनही नववधूंना सासरी पाठविण्यास नकार देत धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २७ नोव्हेंबर २०२५ ते ३ जानेवारी दरम्यान घडला असून, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही नववधू, त्यांचे आई-वडील, मध्यस्थ महिला तसेच एका तृतीयपंथीयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८, रा. सीतासोनू नगर, जळगाव) याच्या लग्नासाठी राजारामनगर येथील मनीषा संजय जैन हिने मध्यस्थी केली. तिच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील एका मुलीशी १६ डिसेंबर रोजी लक्ष्मणचे लग्न लावून देण्यात आले. यासाठी ठरल्याप्रमाणे मुलीच्या आई-वडिलांना एक लाख ७० हजार रुपये देण्यात आले. लक्ष्मण भदाणे यांच्या लग्नप्रसंगी त्याचा मित्र गणेश नथ्थू काथार याच्यासाठीही वधू सुचविण्यात आली. त्यावेळी कविता हिची बहीण सविता हिच्यासोबत गणेशचे लग्न लावण्याचे ठरले. या विवाहासाठीही मुलीच्या आई-वडिलांना एक लाख ७० हजार रुपये देण्यात आले आणि दोन्ही लग्न पार पडली. मात्र, लग्नानंतर तरुणांनी पत्नीला सोबत पाठविण्याची मागणी केली असता नववधूंच्या आई-वडील व नातेवाइकांनी शिवीगाळ करत धमक्या दिल्या व तरुणांना तेथून हाकलून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लक्ष्मण भदाणे याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लग्नानंतर कविता हिला तिच्या आई-वडिलांनी माहेरी नेले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी लक्ष्मण भदाणे व गणेश काथार हे पत्नी कविता व सविता यांना घेण्यासाठी पालघर येथे गेले. मात्र तेथे कविताच्या वडिलांनी दोन्ही तरुणांशी वाद घालत त्यांना चारचाकी वाहनातून गुजरातमधील वाघाबारी येथील एका शेतात नेऊन धमकावले व परत पाठविले. या प्रकरणी मनीषा संजय जैन, नववधू कविता पटेल, सविता पटेल, त्यांचे आई-वडील तसेच राणीताई (सर्व रा. चाळ, काटकर पाडा, पालघर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर