जळगाव - लाच घेताना वनपाल आणि खासगी पंटर जाळ्यात
जळगाव, 21 जानेवारी, (हिं.स.) - जिल्ह्यात रावेर तालुक्यातील एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालासह एका खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणात वनपाल राजेंद्र अमृत सरद
जळगाव - लाच घेताना वनपाल आणि खासगी पंटर जाळ्यात


जळगाव, 21 जानेवारी, (हिं.स.) - जिल्ह्यात रावेर तालुक्यातील एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालासह एका खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणात वनपाल राजेंद्र अमृत सरदार व खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपशील असा की, तक्रारदार हा यावल वन विभागांतर्गत जिन्सी (ता. रावेर) वनक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कार्यक्षेत्रातील रोपवनातील निंदणी कामाची तपासणी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या तपासणीनंतर वनपाल राजेंद्र सरदार याने तक्रारदारास व्हॉट्सॲप कॉल करून निंदणीच्या कामातील त्रुटींवरून निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे सांगितले.

निलंबन टाळायचे असल्यास १५ हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगून ही रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी बावणे यांच्यासाठी असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सदर रक्कम खासगी पंटर दीपक तायडे याच्याकडे फोन-पे द्वारे देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र तक्रारदार फोन-पे वापरत नसल्याने त्याने योनो ॲपद्वारे १३ हजार २५० रुपये तायडे याच्याकडे ऑनलाइन पाठवले व त्याचा स्क्रीनशॉट वनपाल सरदार यांना पाठवला. उर्वरित १ हजार ७५० रुपये तक्रारदाराने अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी जाऊन रोख स्वरूपात वनपाल सरदार यांना दिले. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले यानंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. विभागाने पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. चौकशीत वनपाल राजेंद्र सरदार यांनी तक्रारदाराकडून १३ हजार २५० रुपये ऑनलाइन व १ हजार ७५० रुपये रोख स्वीकारल्याची कबुली दिली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून वनपाल राजेंद्र सरदार व खासगी पंटर दीपक तायडे यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande