प्रजासत्ताकदिनी रत्नागिरीत शानदार संचलन
रत्नागिरी, 26 जानेवारी, (हिं. स.) : येथील पोलीस कवायत मैदानावर ७७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्ताने झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड संचलन, चि
प्रजासत्ताकदिनानिमित्ताने रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी सुंदर कार्यक्रम सादर केले


रत्नागिरी, 26 जानेवारी, (हिं. स.) : येथील पोलीस कवायत मैदानावर ७७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्ताने झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड संचलन, चित्ररथाबरोबरच विद्यार्थ्यांनी सादर केलेले दिमाखदार विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे आजच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

सोहळ्यास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यालय पोलीस पथक, पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, पुरुष गृह रक्षक दल, पोलीस बँड पथक, गृह रक्षक महिला पथक, गोगटे महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, गोगटे महाविद्यालय एनसीसी नेव्ही, नवनिर्माण इंग्लिश मीडियम हायस्कूल एनसीसी नेव्ही, पटवर्धन हायस्कूल आर्मी एनसीसी, कॉन्व्हेट स्कूल नेव्ही, रा. भा. शिर्के हायस्कूल नेव्ही, पटवर्धन हायस्कूल नेव्ही, ए. डी. नाईक गर्ल हायस्कूल स्काऊट गाइड, जीजीपीएस इंग्लिश स्कूल एनसीसी नेव्ही, मेस्त्री हायस्कूल एनसीसी नेव्ही, गोदूताई जांभेकर विद्यालय एनसीसी आर्मी, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलीस कॅडेट, पोलीस श्वान पथक, अग्निशामन दल, प्राथमिक शिक्षण विभाग आदींनी संचलन करून मानवंदना दिली.

आविष्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी डंबेल कवायत, मेस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर, फाटक हायस्कूलने लेझीम नृत्य तसेच शिर्के हायस्कूलने योगासने प्रात्याक्षिक, लाठी फिरविणे, तलवारबाजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असे विविध दिमाखदार नृत्य, खेळ, कार्यक्रम सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना जिंकले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्या संकल्पनेतून शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या मार्गदर्शनातून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षण विभाग, समग्र शिक्षा अंतर्गत केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्या सहकार्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व गुणवत्ता वाढ या विषयावर चित्ररथ साकारला होता. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचे साक्षीदार आहेत. याचे दर्शन घडविण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी नासा, इस्रो निवड चाचणी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी नासा, इस्रो या वैज्ञानिक संस्थांना भेट देऊन आले आहेत. शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषातूनच आत्मनिर्भर भारत साकार होत आहे. या देखाव्याने प्रगत, वैज्ञानिक आणि सशक्त भारताचे दर्शन घडविले.

'स्वच्छ भारत अभियान' आणि 'हरित महाराष्ट्र' उपक्रमातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणारा देखावा उभारण्यात आला होता. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान ग्रामीण व शहरी भागात तंत्रज्ञानाचे ज्ञान पोहोचवत आहे. शिक्षणामुळे सामाजिक विषमता, अंधश्रद्धा व दारिद्य कमी होण्यास मदत होते. हा संदेश देखाव्यातून दिला.जिल्ह्यात सर्वत्र प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande