अकोल्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विविध सेवांचा शुभारंभ
अकोला, 26 जानेवारी (हिं.स.)वॉररूम, डॅशबोर्ड, व्हाटसॲप चॅटबोट अशा अद्ययावत तंत्रज्ञानाधारित सेवांमुळे नागरिकांना वेळीच अचूक माहिती व सेवा मिळून पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
Photo


अकोला, 26 जानेवारी (हिं.स.)वॉररूम, डॅशबोर्ड, व्हाटसॲप चॅटबोट अशा अद्ययावत तंत्रज्ञानाधारित सेवांमुळे नागरिकांना वेळीच अचूक माहिती व सेवा मिळून पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात पालकमंत्री कार्यालय व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सुशोभीकरण कामे, वॉररूम, डॅशबोर्ड व व्हाटसॲप चॅटबोट प्रणाली, बहुउद्देशीय सभागृह, सौर ऊर्जा पॅनल , मिशन एक्सलन्स टार्गेटपीक शैक्षणिक ॲप आदी विविध सेवा-सुविधांचा शुभारंभ झाला. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचे नवे सुसज्ज कार्यालय व सभागृह जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड, चॅटबोट, वॉररूम या सेवांचे लोकार्पण झाले. वॉररूमद्वारे आपत्ती व्यवस्थापनादरम्यान यंत्रणा सज्ज करणे, नागरिकांना माहिती देणे व तातडीच्या प्रसंगी आवश्यक कार्यवाही, ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना तत्काळ संपर्क साधता येणार आहे.

*जिल्हा डॅशबोर्ड*

जिल्हा डॅशबोर्डद्वारे शासकीय योजनांची योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सद्य:स्थिती नागरिकांना जाणून घेता येणार आहे. सुशासन व जनतेप्रती उत्तरदायित्वाची संकल्पना त्यातून साकारणार आहे.

*व्हाटसॲप चॅटबोट*

अकोला जिल्हा व्हाटसॲप चॅटबोट उपक्रमाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. 8799952158 या व्हाटसॲप क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना सर्व योजना, सेवांची माहिती थेट मोबाईलद्वारे मिळणार आहे.

मिशन एक्सलन्स या टार्गेट पीक ॲपचाही शुभारंभ झाला. त्याद्वारे जि. प. शाळा, मनपा आदी शाळांतील विद्यार्थ्यांकडून महत्वाच्या विषयांचे अध्ययन करून घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर 150 कि. वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पामुळे वीजेवरील खर्चात मोठी बचत होणार आहे.

शासनातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सर्वोत्तम पोलीस अधिक्षक पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा सूचना अधिकारी अनिलकुमार चिंचोले, ऋषिकेश आग्रे यांनाही उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande