
सोलापूर, 26 जानेवारी (हिं.स.)पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे,पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार,पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक दिपाली काळे,माजी आमदार नरसिंग मेंगजी,अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख तसेच पदाधिकारी,स्वातंत्र्यसैनिक,ज्येष्ठ नागरिक,पालक,विद्यार्थी,पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की,भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीत बहुमोल योगदान दिले. संविधानाने आपल्याला न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मूल्यांचा वारसा दिला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार,धर्म स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही म्हणून ओळखली जाते,असे त्यांनी सांगितले.
26जानेवारी1950रोजी भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. भारतीय संविधान अंमलात आले आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने स्वतःची दिशा ठरविली. विविधतेत एकता हा भारताचा आत्मा प्रजासत्ताक दिनाद्वारे अधोरेखित होतो. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा,संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ या,असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड