
रत्नागिरी, 26 जानेवारी, (हिं. स.) : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूलने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात यश मिळवले.
स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलच्या संघाने अटीतटीच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत राज्य चषकावर आपले नाव कोरले. राज्य स्पर्धेतील प्रवासात मिस्त्री हायस्कूलच्या संघाने प्रारंभी उपांत्यपूर्व सामन्यात बलाढ्य मुंबई विभागाचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या उपांत्य सामन्यात संभाजीनगर विभागावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात नागपूर विभागाविरुद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मिस्त्री हायस्कूलने विजय मिळवला आणि राज्यस्तरीय चषकाचे मानकरी ठरले. या यशस्वी संघात आयान अन्सार सोलकर, शेरान शौकत वस्ता, गुफ्रान शेख, नुमान सैफान चरके, रफान सोलकर, जवाद वस्ता, जियान मुकादम, जियान होडेकर, जैन सोलकर, कैफ काझी, कासिम बोरकर, कासिम सोलकर, इमान माखजनकर, असद भाटकर, अर्फिन पावसकर आणि रय्यान सोलकर या खेळाडूंचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी